Address: Thane, Maharashtra, 400605 |
खारेगाव येथून ठाणा स्टेशनपर्यंत पोहचण्यासाठी ठाणे महानगर परिवहन सेवेकडून लोकमान्य नगर, किसननगर, ठाणे स्थानक, चेंदणी कोळीवाडा या बसेस रोज चालविल्या जातात. परंतु या बसेस रोज नियमित वेळेवर येत नाहीत. प्रत्येक बसच्या मध्ये अर्धा अर्धा तासांचे अंतर असते. साहजिकच सकाळच्या वेळी कामावर जाणा-या रहिवाशांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने अर्ध्या तासांच्या वेळेत बससाठी ताटकळत उभे राहणा-या प्रवाशांची मोठया प्रमाणावर गर्दी होते. येणा-या बसेस पारसिक नगर, हिरादेवी मंदीर (खारेगाव अंतिम थांबा), खारेगाव नाका येथून खचाखच भरून येतात.
पुरूष प्रवासी या काठोकाठ भरलेल्या बसेसना मागच्या व पुढच्या दाराला अक्षरश: लोंबकळून प्रवास करतात. त्यातही, सकाळी 8 ते 10 या वेळेत तर 1 तासाच्या अंतराने लोकमान्य नगर व ठाणे स्थानक या दोन बसेस तर मुंब्रा येथून दोन चेंदणी कोळीवाडा बसेस या एवढयाच बसेस जातात. यावरून आपण कल्पना करू शकता की या बसना किती प्रमाणात गर्दी होत असेल. अशा परिस्थितीत, पुरुष प्रवासी किमान लोंबकळत प्रवास करतात, पण महिला प्रवाशांचे काय? त्यांनीदेखील असाच जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा का? आणि त्यांना असे काठोकाठ भरलेल्या बसेसच्या दारात लोंबकळत उभे राहून प्रवास करणे शक्य आहे का?
यापूर्वी सकाळी 8:30 च्या दरम्यान खारेगाव मधून महिलांकरिता विशेष बस सोडण्यात येत होती. जीची सकाळी खारेगाव ते ठाणे स्थानक ही केवळ एकच फेरी असायची. या एकाच बसला महिला प्रवाशांना ठाणे स्थानकापर्यंत सुखरूप पोहचता येत होते. पूर्वी ही बस सकाळी 8:30 किंवा 8:45 पर्यंत नियमित येत होती. परंतु, गेल्या 3 आठवडयापासून ही बस एक दिवस येते तर आठवडयातले 5 दिवस नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. याबाबत ठाणे स्थानकात जाऊन चौकशी केली असता ‘’डेपोतूनच बसेस सोडल्या जात नाहीत तर आम्ही काय करणार असे उत्तर मिळाले. तुम्ही तुमच्या विभागातील नगरसेवकांना ही समस्या सांगा’’, असे असमाधानकारक उत्तर मिळाले.
आपण म्हणाल की, ठाणे स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी इतरदेखील पर्याय आहेत. जसे, रिक्षा, खाजगी बसेस. पण या रिक्षादेखील खारेगाव ते कळवा नाका इथपर्यंत 10 रू. प्रतीप्रवासी या दराने असतात. तिथून पुढे कळवा नाका ते ठाणे स्थानक इथपर्यंत 12 रू. प्रतीप्रवासी या दराने रिक्षा असतात. त्यामुळे रिक्षाने अशी दुहेरी कसरत करावी लागते. पैशाचा दुहेरी फटका बसतो तो वेगळा. बसने ठाणे स्थानकापर्यंतचा दर 13 रू. आहे. जो आम्हा सर्वसामान्यांना प्रतीदिनी परवडण्यासारखा आहे. खाजगी बसेसची संख्या तर हातावर मोजण्यासारखी आहे.
येथे असेदेखील नमूद करण्यात येते की, पारसिक नगर येथून ठाणे स्थानकासाठी स्वतंत्र ठाणे स्थानक ही बस आहे. रघुकुल सोसायटी, पारसिक येथून ठाणे स्थानकासाठी स्वतंत्र ठाणे स्थानक ही बस आहे. सहयाद्री सोसायटी, कळवा येथून देखील ठाणे स्थानकासाठी स्वतंत्र ठाणे स्थानक ही बससेवा आहे. या सर्व बसेस तेथील स्थानकांपासून भरूनच येतात. या बसेसना देखील चढताना दत्तवाडी, मनिषा नगर येथील प्रवाशांचे हाल होतात.
रिक्षावाल्यांना दत्तवाडी अथवा मनिषानगर येथून थेट ठाणे स्थानकपर्यंत सोडण्यास विचारले तर कोणीही रिक्षावाला तयार होत नाही. सर्व फक्त कळवा नाकापर्यंतच सोडण्यास तयार असतात.
वरील सर्व परिस्थितीचा विचार करता आम्हा सर्वांची आपणांस कळकळीची विनंती आहे की, निदान सकाळी 8:30 वाजता खारेगाव येथून सोडण्यात येणारी महिला विशेष ही बस तरी नियमित वेळेवर आणली जावी यासाठी आपण कृपया काहि मदत करावी. जेणेकरून महिला प्रवाशांना प्रवास करणे सोईचे होईल. तसेच लोकमान्यनगर, किसननगर व ठाणे स्थानक या बसेसदेखील सकाळच्या वेळी ठराविक वेळेच्या अंतराने खारेगावातून सोडण्यात येतील याबाबत देखील एखाद ठोस पाऊल उचलावे ही नम्र विनंती.
Was this information helpful?
Post your Comment